अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरावर रेल्वेचा भर   

वृत्तवेध

भारतीय रेल्वेने २०३० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनापर्यंत पोहोचण्यासाठी संतुलित ऊर्जा धोरण अवलंबण्याची योजना आखली आहे. त्यात रेल्वे अणु, सौर, जल ऊर्जा, पवन आणि थर्मल ऊर्जा स्त्रोतांचा वापर करेल. या उपक्रमामुळे राष्ट्रीय वाहतूकदाराची दहा गीगावॅट कर्षण ऊर्जेची गरज पूर्ण करण्यात मदत होईल.
 
२०३० पर्यंत तीन गीगावॉट अक्षय ऊर्जा आणि तीन गीगावॉट थर्मल आणि आण्विक ऊर्जा खरेदी करण्याची रेल्वेची योजना आहे. उर्वरीत चार गीगावॉट ट्रॅक्शनसाठी वीज वितरक कंपन्यांशी करार केले जातील. एका वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने ऊर्जा मंत्रालयाला दोन गीगावॉट अणुऊर्जा वाटप करण्याची विनंती केली आहे. तसेच दोन गीगावॉट औष्णिक ऊर्जा नवीन संयुक्त उपक्रम प्रस्ताव आणि वीज खरेदी कराराद्वारे घेतली जाईल. याशिवाय ५०० मेगावॉट राउंड-द-क्वॉक अक्षय ऊर्जेसाठीही करार केले जात आहेत.
 
यासोबतच जलऊर्जा प्रकल्पदेखील या योजनेचा एक भाग असतील. त्यासाठी सरकार सुमारे १.५ जलऊर्जा प्रकल्पांची योजना आखत आहे. ते रेल्वेला ऊर्जा पुरवठा करतील. या प्रकल्पांमधून रेल्वेला ऊर्जा मिळणार आहे. आगामी काळात रेल्वे यंत्रणा तंत्रज्ञानाशी पूर्णपणे जोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यासाठी ‘वंदे भारत’सारख्या गाड्याही सुरू करण्यात आल्या आहेत. रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार भारतीय रेल्वे या आर्थिक वर्षात ब्रॉडगेज मार्गांवर शंभर टक्के विद्युतीकरणाचे लक्ष्य साध्य करेल. २०२५-२६ पर्यंत, ९५ टक्के गाड्या विजेवर धावतील. त्यामुळे थेट कार्बन उत्सर्जन प्रति वर्ष १.३७ दशलक्ष टनाने कमी होईल आणि ही पातळी २०३० पर्यंत राखली जाईल. सरकार सातत्याने रेल्वे पूर्णपणे विजेवर चालवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचा परिणाम असा की सध्या देशातील ९० टक्के गाड्या विजेवर धावत आहेत तर फक्त दहा टक्के डिझेलवर धावत आहेत. तीन वर्षांपूर्वी हा आकडा ३७ टक्के होता.
 

Related Articles